ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 17 मे पर्यंत लॉक डाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र राज्य सरकारने काही नियम शिथिल करत अन्य दुकाने, विशेषतः दारूची दुकाने सुरू करण्यास रविवारी परवानगी दिली होती. मात्र, यानंतर शहरात अनेक नियम पायमल्ली झाल्याच्या घटना समोर आल्या. त्यानंतर आता मुंबईमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.
परदेशी यांनी मुंबईमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील असे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे आता मद्यविक्री आणि कोरोनाचा प्रभाव नसणाऱ्या विभागातील पाच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी ही रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 9 हजारच्या वर पोहचली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.









