ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात हळूहळू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. तरी देखील तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र, पुरेशा लसींच्या साठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण मोहिमेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.

काल (मंगळवारी) दिनांक 20 जुलै, 2021 रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील काही लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (बुधवार) दिनांक 21 जुलै 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
यासोबतच लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, जुलैमध्ये पालिकेने आत्तापर्यंत तीन वेळा लसीकरण बंद ठेवले आहे. लसतुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातही अनेक शहरांत बुधवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.
- गेल्या 24 तासात 351 नवे रुग्ण
मुंबईत मागील 24 तासात 351 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 525 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 7,07,654 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुंबईचा रिकव्हरी रेट 97 % इतका आहे. कालच्या दिवशी 13 रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या मुंबईत 7,012 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1063 दिवसांवर गेला आहे.









