- कमी लस पुरवठ्यामुळे राज्यातील लसीकरणावर परिणाम
ऑनलाईन टीम / मुंबई :
देशभरात 21 जून म्हणजेच, आजपासून केंद्र सरकार प्रत्येक राज्यात 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करणार आहे. पण मुंबईत मात्र 18 ते 29 वयोगटातील लसीकरण करण्यात येणार नाही. गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
- गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय
दरम्यान, केंद्राने जाहीर केल्यानुसार आजपासून देशभरात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू असणार आहे. परंतु, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने दोन गटांत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत आजपासून केवळ 30 वर्ष वयोगटावरील व्यक्तींचे लसीकरण सुरु राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. यामध्ये 249 सेंटरवर 30 वयोगटावरील व्यक्तींचे 50% वॉक इन आणि 50% ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन लसीकरण होणार आहे. 7 सेंटरवर परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण असेल. तसेच, काही सेंटरवर कोवॅक्सिनचे दुसरे डोस दिले जाणार आहेत.
- केंद्राच्या मोफत लसीकरणाला आजपासून सुरुवात
दरम्यान, 7 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षांवरील नागरिकांना 21 जून म्हणजेच आज पासून मोफत लस देणार असे जाहीर केले होते. यासाठी कोरोना लसींचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांकडून एकूण लसीच्या 75 टक्के भाग भारत सरकार स्वतः खरेदी करुन राज्य सरकारांना मोफत देणार आहे. तसेच भारतात तयार होणाऱ्या लसींपैकी 25 टक्के लसीचे डोस खाजगी रुग्णालये थेट विकत घेऊ शकणार आहेत. तशी परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.









