ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढा आहे. त्यासाठी सर्वांनीच मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. असे असले तरी बऱ्याच राज्यात लसींचा पुरवठा उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद आहे.
महाराष्ट्रातील मुंबई शहरात देखील हीच परिस्थिती आहे. लसींचा साठाच उपलब्ध नसल्याने मुंबईतील लसीकरण तीन दिवस म्हणजेच 30 एप्रिल ते 2 मे या काळात बंद असणार आहे. अशी माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
ते म्हणाले, केंद्र शासनाने दिलेला साठा काल रात्री संपला आहे. त्यामुळे लसीकरण लस मिळेपर्यंत बंद असेल. तसेच वॉक इन लसीकरण सिस्टीम बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी रजिस्ट्रेशन करूनच केंद्रावर यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच 1 मेपासून नियोजित 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुरेशा लससाठ्याअभावी पुढे ढकलले जाण्याची शक्यताही पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.
- सर्वांना लस मिळेल, महापालिकेची सूचना
45 वर्षे व अधिक वयोगटातील सर्व नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळेल, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे. नागरिकांनी मनात संभ्रम ठेवू नये. लससाठा उपलब्ध होताच प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे चिंताग्रस्त होऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.
या दरम्यानच्या कालावधीत, महानगरपालिकेला लससाठा प्राप्त झाला व लसीकरण सुरू होणार असेल तर त्याची माहिती प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांतून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल. नोंदणीकृत पात्र व्यक्तींनाच आता लस दिली जाणार आहे.
पालिका आणि शासकीय रुग्णालयांमध्ये मिळून 63 लसीकरण केंद्रांवर तर खासगी रुग्णालयात 73 लसीकरण केंद्रांवर कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. अलीकडे लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन दैनंदिन लसीकरण मोहिमेचे नियोजन प्रशासन करीत आहे.









