ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईमध्ये वीजपुरवठा अनेक ठिकाणी खंडित झाला आहे. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तसेच इंटरनेटही बंद झाल्याने मुंबई-ठाण्यातील कामे ठप्प झाली आहे.
- रुग्णालयांना फटका
मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत.
- इंटरनेट सेवा ठप्प
मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेटही बंद झालं. त्या सरकारी आणि खासगी कार्यालयातील काम ठप्प झालं. तर इंटरनेट ठप्प झाल्यामुळे मोबाईलमधून मेसेजही जात नव्हते. सोशल मीडियाही अचानक ठप्प झाल्याने मुंबईकरांमध्ये एकच गोंधळ उडाला. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस देखील रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान, टाटा कडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे, अशी माहिती बेस्ट कडून देण्यात आली आहे.









