प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या भीतीने मुंबईतून पायी प्रवास करत येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ थांबता थाबेनासा झाला आहे. चार दिवसापासून जीव धोक्यात घालत पायी प्रवास करत गावी दाखल झालेल्या ४० वर्षीय तरुणास गुरुवारी सायंकाळी उशिरा आरोग्य पथकाकडून क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. कोरोनाच्या लाकडाऊनमुळे कामधंदाच नसल्याने अन् गाठीला पैसेही नसल्याने चाकरमान्यांचे हाल सुरू असून रेल्वे ट्रॅकसह पायी प्रवास करत गाव गाठत आहेत. मूळचा देवधर-वाक्षेपवाडी येथील रहिवाशी असलेला व सध्या डोंबिवली येथे कामानिमित वास्तव्यास असलेल्या तरुणानेही पायी प्रवास करत गाव गाठण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो चार दिवसापूर्वी प्रवासाला निघाला. हा तरूण गुरुवारी आपल्या गावीही दाखल झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथून गावी आलेल्या या तरूणाने आपण आल्याबाबतची कल्पना पोलीस पाटील व सरपंच यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. आपणास क्वारंटाईन करावे, असेही दस्तुरखुद्द त्यानेच सांगितल्याचे समजते. त्यानंतर याबाबत आरोग्य प्रशासनास कळवल्यानंतर त्यास क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू होत्या.









