प्रतिनिधी/ खेड
कोरोनाच्या भीतीने मुंबईतून पायी प्रवास करत येणाऱया चाकरमान्यांचा ओघ थांबता थांबेनासा झाला आहे. चार दिवसांपासून जीव धोक्यात घालत पायी प्रवास करत गावी दाखल झालेल्या 40 वर्षिय तरूणास क्वारंटाईन करण्यात आले.
मूळचा देवघर-वाक्षेपवाडी येथील रहिवाशी असलेला व सध्या डोंबिवली-मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेला हा तरूण चार दिवसांपूर्वी प्रवासाला निघाला. गुरूवारी गावी दाखल झाल्यानंतर आपण आल्याबाबतची कल्पना पोलीस पाटील व सरपंच यांना दिली. यानंतर आरोग्य पथकाने त्याची प्राथमिक तपासणी करत क्वारंटाईन केले.
पुणे येथून परतलेल्या लोटे येथील परशुराम नर्सिंग महाविद्यालयातील 45 विद्यार्थिनींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळे चार संस्थात्मक विलगीकरण कक्षात निगराणीखाली असलेल्या नागरिकांची संख्या 94 वर पोहचली आहे.
परदेशासह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड यासह अन्य शहरातून गावी येणाऱया नागरिकांवर आरोग्य पथकाची अजूनही करडी नजर आहे. आतापर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 312 वर पोहचली आहे. 50 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर डाकबंगला परिसरात कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आल्यानंतर नगरप्रशासनानेही 7 पथके तैनात करत सर्व्हेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. या सर्व्हेक्षणांतर्गत परदेशासह मुंबई, पुणे व अन्य शहरातून येथे आलेल्या नागरिकांची प्राथमिक तपासणी करून होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसापासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात आयसोलेशनमध्ये गुरूवारी सायंकाळी आणखी दोघांची भर पडली. या 7 जणांवर निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्षात 46 जण देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. या संख्येत गेल्या दोन दिवसात वाढ झाली आहे. पुणे येथील दिनानाथ हॉस्पीटलमध्ये इंटरशीपसाठी गेलेल्या लेटे येथील परशुराम नर्सिंग महाविद्यालयातील 45 विद्यार्थिनी येथे परतल्या आहेत. या सर्व विद्यार्थिनींची प्राथमिक तपासणी करून परशुराम हॉस्पीटलमधील संस्थात्मक विलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात 23, आय.सी.एस. महाविद्यालयातील कक्षात 16 तर कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील कक्षात 10 जण निगराणीखाली आहेत. 8 व्या दिवशीही आरोग्य पथकाने अलसुरे, निळीक, कोंडिवली, भोस्ते, मोरवंडे या पाच गावांतील 1450 घरांचे सर्व्हेक्षण करून 6326 नागरिकांची तपासणी केली. शहरातील डाकबंगला परिसरात तैनात 7 पथकांनी 1171 घरांचे सर्व्हेक्षण करत 3401 नागरिकांची तपासणी केली.









