मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईला अधिक वेगवान बनवणाऱ्या मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. कांदिवलीतील आकुर्ली स्टेशनवरुन या चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यावेळी उपस्थित होत्या.यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यावर होणाऱ्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली. मुंबईतील गर्दी अशीच कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जनतेशी संवाद साधला. सविस्तर माहिती जनतेला दिली आणि आज सकाळी सारंकाही उघडल्यासारखं लोक गर्दी करताना दिसले. कार्यक्रमाला येताना आम्हालाच ट्राफीक लागलं. हे चालणार नाही. निर्बंधांचं पालन करणं गरजेचं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अजित पवारांच्या विधानाचा दाखला देत मुंबईतील गर्दीवर नाराजी व्यक्त केली. अजित दादांना जे वाटलं तेच मलाही जाणवलं. मी काल लॉकडाऊन उठवत असल्याचं तर काही चुकून बोललो नाही ना असं मी अधिकाऱ्यांना विचारलं. इथं येताना रस्त्यावर बरीच गर्दी दिसली हे योग्य नाही. मुंबईत जर अशीच गर्दी कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
विकासकामांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, वर्षभराहून अधिक काळ कोरोनाचे सावट राज्यावर आहे. मात्र याकाळात उपचारांच्या सुविधा निर्माण करतानाच मुंबई सारख्या वेगवान महानगराचा विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. मुंबई वाढतेय तसा तिच्या विकासाचा वेगही कायम राखतोय, असेही त्यांनी सांगितले. विविध पायाभूत आणि दळणवळणाच्या प्रकल्पांमुळे मुंबई जो वेग घेत आहे त्या प्रवासात मुख्यमंत्री म्हणून सहभागी होता आले असे सांगतानाच मुंबई मेट्रोच काम आखीव-रेखीव आणि देखणं झाले आहे. मेट्रोची स्थानके, कोच यासाठी नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.