किमान तापमानात दोन अंशाने पुन्हा वाढ
आधीच थंडीला विलंब झाला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात अचानक किमान तापमान घसरू लागल्याने वर्षाचा पहिला दिवस बऱयापैकी थंडीचा होता. मात्र, लगेच दुसऱया दिवशी गुरुवारी मात्र किमान तापमानात दोन अंशाने पुन्हा वाढ होऊन मुंबईतील किमान तापमान सरासरी 18 अंश सेल्सिअसवर आले. ढगाळ वातावरण, मुक्त न होणारी उष्णता, चार चक्री वादळे, पाऊस अशा वातावरण स्थितीला तोंड देत थंडी स्थिरावू पाहतेय. पण, त्यासाठी पोषक वातावरण आजही तयार होत नसल्याचे दिसून येत आहे.
2019 मध्ये सगळेच ऋतू उशिराने होते. आजही पावसाला पोषक वातावरण आहे. ढगाळ वातावरण राहिल्यास थंडी पडत नाही. शिवाय मुंबईच्या थंडीसाठी पोषक असणारे उत्तरेकडून येणारे गार वारे महाराष्ट्रात डिसेंबर महिना अखेरपर्यंत वाहत नव्हते. तसेच स्थानिक घटकांमुळे वातावरणात बाष्प तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. गोव्यापासून पालघरपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे मुंबईच्या वातावरणात अस्वस्थता पसरली होती. 1 जानेवारी रोजी मुंबईचे किमान तापमान सरासरी 16 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. मात्र, लगेचच दुसऱया †िदवशी दोन अंशाने वाढ होत 18.5 अंश झाले. यावेळी आर्द्रतेच्या टक्केवारीत देखील सरासरी 90 टक्क्यांनी वाढ झाली होती. आकाश निरभ्र असल्याने मात्र मुंबईत गारवा कायम होता.
थंडी रेंगाळण्याची कारणे….
ईशान्येकडून येणारे वारे बंगालच्या उपसागराकडून वाहणाऱया वाऱयाला भारतापर्यंत पोहचू देत नव्हते. त्यात ढगाळ वातावरणामुळे पृथ्वीवरील उष्णता वातावरणात मुक्त न होता जमिनीवरच दाबली जात होती. या महत्वाच्या कारणामुळे तापमान उतरत नव्हते. पूर्ण हवामानाचे चक्रच विलंबाने होत आहे. चार चक्रीवादळाला सामोरे जावे लागले. यात ऑक्टोबर हिट लागलीच नाही. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱया थंडीसाठी पूरक वातावरण नव्हते. थंडीला उशीर होण्यास ही प्राथमिक कारणे असून आता यापुढे 4 जानेवारी नंतर थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे, असे हवामान अभ्यासक अंकुर पुराणिक यांनी सांगितले.
विदर्भाला 2 ते 6 जानेवारी पावसाचा इशारा
विदर्भाला आगामी पाच दिवसांसाठी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. बुधवारी विदर्भात तुरळक पाऊस झाला. 2 ते 6 जानेवारीदरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटात पाऊस होणार आहे.









