वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबईची माजी महिला क्रिकेटपटू रंजिता राणे यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. त्या 43 वर्षांच्या होत्या. 1995 ते 2003 या कालावधीत त्यांनी मुंबईतर्फे 44 प्रथमश्रेणी सामन्यांत भाग घेतला होता.
स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी त्यांना टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या अष्टपैलू क्रिकेटपटू होत्या. त्या मध्यमगती गोलंदाजी करायच्या. 2016 मध्ये एमसीए स्कोअरिंग परीक्षा पास झाल्यानंतर 2017 पासून त्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या स्कोअरर बनल्या होत्या. कर्करोगावर महागडे उपचार करण्यासाठी एमसीएने त्यांना मोठी आर्थिक मदत केली होती. याशिवाय डायना एडलजी यांनीही त्यांना दोन-तीन वर्षापूर्वी सिद्धिविनायक ट्रस्टकडून उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून दिली होती. मुंबई, बॉम्बे युनिव्हर्सिटी व इंडियन जिमखाना या संघांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते.









