पावसाळी दुखण्यावर अजून मात्रा सापडलेली नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचा लौकिक कायम ठेवायचा असेल तर पावसाळ्यात तुंबणाऱया मुंबईचे चित्र बदलावे लागेल.
अलीकडे जुलै, ऑगस्ट महिन्यातील पाऊस मुंबईकरांच्या मनात धडकी भरवणारा ठरू लागला आहे. अतिवृष्टी सुरू झाली की मुंबईकरांना 15 वर्षापूर्वीच्या जलप्रलयाच्या कटू आठवणी अस्वस्थ करतात. मुंबईत गेल्या आठवडय़ात सलग तीन दिवस झालेला मुसळधार पाऊस 26 जुलैची आठवण करून देणारा ठरला. या पावसाने मुंबईची पार दाणादाण उडवली. तडाखेबंद पावसामुळे मुंबई दरवर्षीप्रमाणे यंदाही जलमय झाली. कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबईतील वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार मर्यादित असले तरी मुंबईकरांना पावसाचा फटका बसला. मध्य, पश्चिम, हार्बर अशा तीनही मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद पडली. रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईकर चाकरमानी ठिकठिकाणी अडकून पडले होते. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की मुंबई परिसरातील सरकारी कार्यालयांना एक दिवस सुट्टी द्यावी लागली. पावसाचा पुढील अंदाज लक्षात घेऊन नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन सरकारला करावे लागले. त्यामुळे आधीच लॉकडाऊनची नामुष्की सहन करत असलेल्या मुंबईकरांची आणखी कोंडी झाली.
सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर गुरुवारपर्यंत कायम होता. या तीन दिवसांत मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले. दादर हिंदमाता, परळ, माटुंगा, वडाळा, कुर्ला, अंधेरी, मिलन सबवे अशा नेहमीच्या ठिकाणांशिवाय घाटकोपर, पवई, साकिनाका, वांद्रे पूर्वच्या परिसराला पाण्याचा वेढा पडला होता. उत्तर मुंबईत अनेक भागातील रहिवाशांना पावसामुळे दोन रात्र जागून काढाव्या लागल्या. नाल्याकाठी वसलेल्या झोपडय़ांमध्ये पाणी शिरले. एरवी पावसाळ्यात दक्षिण मुंबईचा परिसर सुरक्षित समजला जातो. पण या पावसाने हा समज खोटा ठरवला. गुरुवारी झालेल्या धुवांधार पावसामुळे गिरगाव, ग्रँटरोड, नळबाजारचा परिसर जलमय झाला. मंत्रालयासमोर पाणी साचले होते. कधी नव्हे ते जे. जे. रुग्णालयात पाणी शिरले होते. पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱयामुळे मंत्रालय, फोर्ट परिसरातील अनेक वृक्ष उन्मळून पडले. मुंबईत अतिवृष्टी झाली की त्याचा पहिला फटका उपनगरीय रेल्वेवाहतुकीला बसतो, याचा प्रत्यय पुन्हा आला. कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी रेल्वेसेवा सुरू आहे. जे कर्मचारी मंगळवारी कसेबसे कामावर पोहोचले ते दुपारपासून अडकून पडले. मशीद बंदर रेल्वेस्थानकातील रूळ अडीच-तीन फूट खोल पाण्याखाली गेले होते. एनडीआरएफच्या जवानांनी बोट वल्हवत 250 प्रवाशांची सुटका केली. रेल्वे रुळावर बोट दिसावी हे दुर्दैवी चित्र मुंबईतील पर्जन्यवाहिन्यांच्या स्थितीविषयी बरेच काही सांगून जाते.
गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसाची तुलना 15 वर्षापूर्वी म्हणजे 26 जुलै 2005 रोजी झालेल्या पावसाशी केली जाते. जर मुंबईचे जनजीवन सुरळीत असते तर या पावसाने मुंबईकरांना मोठय़ा संकटात टाकले असते. मात्र, कोरोना साथीचे संकट आणि लॉकडाऊनमुळे पावसाची भीषणता फारशी जाणवली नाही. एरवी मुंबईत कुलाबा येथे पावसाची वार्षिक सरासरी 212 सेंटीमीटर आहे. तर सांताक्रूझ येथे 232 सेंटीमीटर पाऊस पडतो. साधारणतः 65 मिमी पाऊस पडला तर अतिवृष्टी मानली जाते. मुंबईत बुधवारी 300 मिमी पाऊस पडला. त्यामुळे मुंबई तुंबल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. खरेतर अस्मानी संकटाचा कधीच अचूक नेम नसतो. त्यामुळे ढगफुटी किंवा मोठय़ा पावसाचे कारण पुढे करून मुंबई महापालिकेला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा सक्षम करणे हे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य आहे. परंतु, आज 15 वर्षानंतरही परिस्थितीत फार काही फरक पडलेला नाही. ब्रिटिशकालीन भूमिगत गटारे, सांडपाणी व्यवस्था यावरच अद्याप मुंबई महापालिकेची मदार आहे.
2005 च्या जलप्रलयानंतर केंद्र सरकारच्या मदतीने मुंबईसाठी 1200 कोटी रु. खर्चाचा ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आला. त्यासाठी जलतज्ञ माधवराव चितळे यांच्या अभ्यास समितीचा आधार घेण्यात आला. पावसाचा जोर आणि त्याचवेळी समुद्राला भरती असेल तर तुंबलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पाणी तुंबते असा महापालिकेचा दावा आहे. या दाव्याशी पर्यावरण अभ्यासक सहमत नाहीत. मुंबईत पाणी मुरण्यास जमीन शिल्लक राहिलेली नाही. काँक्रिटीकरण, झाडांची बेसुमार कत्तल आणि नियोजनाचा अभाव यामुळे कितीही प्रकल्प उभारले तरी काहीच उपयोग होणार नसल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची तुंबण्यापासून सुटका होईल की नाही हा प्रश्न शिल्लक राहतोच.
दरवर्षीचा पाऊस मुंबईला एक-दोन दिवस वेठीस धरतो. असा मोठा पाऊस झाला की मुंबईकरांनाही पावसाचा फील येतो. परंतु हा पाऊस मुंबई महापालिकेच्या नालेसफाईचे, रेल्वे प्रशासनाच्या पूर्वतयारीचे दावे पार धुवून काढतो. मुंबईत पाणी साचले की वृत्तवाहिन्यांवर समस्या आणि उपाययोजनांची चर्चा रंगते. वर्तमानपत्रात मुंबईच्या वाताहतीबद्दल भरभरून लिहिले जाते. केंद्र सरकारकडून माहिती घेण्यात येते. नागरिक सरकार, महापालिकेच्या नावे बोटे मोडतात. मात्र, पावसाळा संपला की चर्चा थांबते. उपाययोजना कागदावरून कासवगतीने पुढे सरकत राहते. पुन्हा पुढच्या वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईत पाणी साचणार नसल्याचे दावे केले जातात. सहनशील मुंबईकरांना आता सरकार, प्रशासनाच्या दाव्याचे अजिबात अप्रुप वाटत नाही. तो पावसाळ्यातील त्रासाला सामोरे जाण्याची मानसिक तयारी करतो.
खरेतर गेली दोनअडीच दशके मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, या कालावधीत मुंबईच्या पावसाळी दुखण्यावर अजून मात्रा सापडलेली नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचा लौकिक कायम ठेवायचा असेल तर पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱया मुंबईचे चित्र बदलावे लागेल. मुंबईने पावसात हतबल, असहाय्य व्हावे हे योग्य नाही. आज राज्य सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. याआधी विरोधी पक्षात असताना मुंबईत पाणी तुंबले की एमएमआरडीए किंवा अन्य यंत्रणेकडे बोट दाखवले जात होते. आता शिवसेनेला दुसऱयाच्या डोक्यावर खापर फोडता येणार नाही. मुंबईच्या दरवर्षीच्या पावसाळी दुखण्यावर कायमस्वरूपी इलाज करावाच लागेल.
प्रेमानंद बच्छाव