वृत्तसंस्था/ शारजा
बलाढय़ मुंबई इंडियन्स व सनराजयर्स हैदराबाद यांच्यात मंगळवारी आयपीएल साखळी फेरीतील शेवटचा सामना होणार आहे. मुंबईने प्लेऑफ फेरी याआधीच गाठली असून हैदराबादसाठी मात्र हा सामना जीवनमरणाचा बनला आहे. मुंबईवर विजय मिळविला तरच त्यांना प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी विविध संघांत चुरस सुरू आहे. पण हैदराबादची धावसरासरी चांगली असल्याने मंगळवारच्या सामन्यात त्यांना केवळ विजय मिळविणे, आगेकूच करण्यासाठी पुरेसे ठरणार आहे. जॉन बेअरस्टोला वगळण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागल्यानंतर सनरायजर्सला योग्य समतोल साधण्यात यश मिळाले आहे. वृद्धिमान साहाला वॉर्नरसमवेत सलामीला पाठविण्याची चाल यशस्वी ठरली आहे तर जेसॉन होल्डरला स्थान दिल्याने संघाला अष्टपैलू पर्याय मिळाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध झालेल्या सामन्यात होल्डर व संदीप शर्मा यांनी सुरुवातीला व अखेरच्या टप्प्यात प्रभावी गोलंदाजी केली. याशिवाय जलद गोलंदाज टी.नटराजन आणि ट्रम्प कार्ड ठरलेला स्पिनर रशिद खान यांच्यामुळे त्यांची गोलंदाजी भक्कम बनली आहे.
आधीच्या दोन सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व आरसीबी यांच्यावर विजय मिळविले असल्याने सनरायजर्सचा आत्मविश्वासही उंचावला आहे. ‘2016 मध्ये आम्हाला तीन सामने जिंकण्याची गरज होती आणि आम्ही ते साध्य करून दाखविले होते,’ असे कर्णधार वॉर्नर आरसीबीविरुद्ध विजय मिळविल्यानंतर म्हणाला होता. चार वर्षापूर्वी सनरायजर्सने या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. मुंबई इंडियन्सच्या या मोसमातील कामगिरीची जाणीव सनरायजर्सला असल्याने मंगळवारी त्यांच्याविरुद्ध खेळताना थोडीशी चूकही देखील आव्हान संपुष्टात आणणारी ठरू शकते. मुंबईचे शेवटच्या चारमधील स्थान निश्चित झाले असल्याने ते निर्धास्त होऊन या सामन्यात खेळतील.
रोहित शर्माच्या गैरहजेरीतही या संघाने आरसीबी व दिल्ली कॅपिटल्ससारख्या संघांचा धुव्वा उडविला आहे.
मुंबईच्या बोल्ट व बुमराह यांनी नव्या चेंडूवर आणि जुन्या चेंडूवर देखील जबरदस्त गोलंदाजी केली आहे. रोहितच्या गैरहजेरीत पोलार्डनेही मुंबई संघाचे प्रभावी नेतृत्व केले आहे. रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी निवड करण्यात आली नसल्याने दोन आठवडय़ापूर्वी त्याला झालेल्या दुखापतीच्या आताच्या स्थितीबद्दल अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. तो लवकरच बरा होईल, असे पोलार्डने दिल्लीवर विजय मिळविल्यानंतर म्हटले होते. शारजातील खेळपट्टीचे स्वरूपही आता बरेच बदलले असून त्यावर आता कमी धावाही पुरेशा ठरू लागल्या आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला त्यावर 200 हून अधिक धावा होत होत्या. शनिवारी झालेल्या सामन्यात आरसीबीला हैदराबादविरुद्ध केवळ 120 धावा जमविता आल्या. हैदराबादने 14.1 षटकातच हे किरकोळ आव्हान पार करीत मोठा विजय मिळविला होता. त्यानंतर मुंबईने सीएसकेला 23 ऑक्टोबर रोजी 9 बाद 114 धावांवर रोखले होते आणि मुंबईने अगदी सहज विजय मिळविला होता.
@मुंबई इंडियन्स : पोलार्ड (कर्णधार), तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंडय़ा, रोहित शर्मा, इशान किशन, पॅटिन्सन, बुमराह, जयंत यादव, कृणाल पंडय़ा, मॅक्लेनाघन, मोहसिन खान, कोल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, डॉ कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, बोल्ट.
@सनरायजर्स हैदराबाद : वॉर्नर (कर्णधार), बेअरस्टो, विल्यम्सन, पांडे, गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, साहा, अब्दुल समद, विजय शंकर, नबी, रशिद खान, होल्डर, अभिषेक शर्मा, बी.संदीप, संजय यादव, फॅबियन ऍलेन, भुवनेश्वर, खलील अहमद, संदीप शर्मा, नदीम, कौल, स्टॅन्लेक, टी. नटराजन, थम्पी.









