ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. तर, शुक्रवारी रात्रीपासून वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड सेंटरची पाहणी केली.

विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महापौर पेडणेकर यांनी बॉम्बे रुग्णालयातील कोविड वॉर्डला भेट देऊन बेडची सद्यस्थिती जाणून घेत रुग्णांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे.
राज्यात सध्या कोरोनावरील लसीच्या पुरवठ्यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. या वादावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईत गळे काढणारे आता सांगतायेत की लस उपलब्धतेवरुन खोटे दावे केले जात आहेत. पण रुग्णालयातल लसीचा साठा शून्य, एक दिवसाचा किंवा दोन दिवसांचा साठा असे दाखवत आहेत. ते खोटे कसे होऊ शकते? इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाणही कमी आहे. आकडेवारीवरून ते स्पष्ट झाले आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तर, मुंबईकरांनो हात जोडून विनंती करते की, या गळे काढणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असे म्हटले आहे.

यावेळी महापौरांनी रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड यांच्या उपलब्धतेचा देखील आढावा घेतला. त्या म्हणाल्या, मुंबईकरांची जेवढी काळजी घेता येईल, तेवढी घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्यामुळे कुठेही प्रशासन म्हणून आम्ही हलगर्जीपणा करत नाही आहोत. लोकांची साथ देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह आलात, तरच कोविड सेंटरमध्ये येऊन ॲडमिट व्हा. लक्षणे नसतानाही खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण बेड अडवत आहेत. त्यांनी पालिकेच्या कोविड सेंटर्समध्ये यावे. ज्यांना आयसीयू बेडची नितांत गरज आहे, त्यांना ते बेड मिळाले पाहिजे, विनाकारण लक्षणे नसलेल्यांनी बेड्स अडवून ठेवू नये, कोणत्याही रुग्णालयाने बेड अडवून ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.









