ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनेच्या प्रवेशासाठी कोणताही दबाव नाही. महाविकासआघडीचे काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे लोकांनी बनवलेली लीडर होणे मी पसंत करेन तसेच मी शिवसैनिक म्हणून आले आहे आणि शिवसैनिक म्हणूनच काम करेन, असा विश्वास अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज व्यक्त केला. उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आयोजित पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.
- कंगनाला गरजेपेक्षा जास्त महत्व दिले गेले
यावेळी कंगनाने काही टीका केली तर तुम्ही उत्तर देणार का? असा प्रश्न विचारला असता मी त्याबाबत काहीही प्रतिक्रिया देणार नाही असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. कंगनाला अजिबात उत्तर देणार नाही. कंगनावर गरजेपेक्षा जास्त बोलले गेेले आहे. आता बोलायची गरज नाही. टीका करायला लोकशाही आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी कंगनाला उत्तर देण्यासाठी मुलाखत दिली नव्हती. त्या मुलाखतीचा तो एक भाग होता. बोलण्याच्या ओघात तसेच प्रश्नही कंगनाबाबत विचारला गेला. त्यामुळे तिच्यावर जास्त बोलले गेले, असे उर्मिला म्हणाल्या.
- मुंबईत महिला सुरक्षित, मला मुंबईचा अभिमान
पुढे त्या म्हणाल्या, शिवसेनेची महिला आघाडी भक्कम आहे. आणि मी त्याचाच एक भाग आहे. मुंबईत महिला सुरक्षित आणि मला मुंबईचा अभिमान आहे. मी ट्रॉलर्सचे स्वागत करते. मी मराठी माणूस आहे, मी पाऊल मागे घेणार नाही.
काँग्रेस सोडताना राजकारण सोडेन असे म्हटले नव्हते. त्यामुळे लोकसेवेत मी कायम असेन. मी शिवसेनेत शिवसैनिक म्हणूनच काम करायला आलेली आहे. माझ्या इथून पुढच्या राजकीय कारकीर्दीत मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीन, लोकनेता होण्याचा प्रयत्न करीन, असेे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सेक्युलर म्हणजे इतर धर्माचा तिरस्कार नाही, धर्म विषय आहे त्याचा वापर करून ऊहापोह करू नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे त्या म्हणाल्या, बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचा अत्यंत किळसवाणा प्रयत्न मधल्या काळात झाला. तेव्हाही मी कुणाच्या विरोधात बोलले नाही, आताही बोलत नाही. मी महाराष्ट्राच्या बाजूने बोलते आहे असेही उर्मिला यांनी यावेळी स्पष्ट केले.