ऑनलाईन टीम / किव्ह :
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज तेरावा दिवस असून, युद्धाची धग आता तीव्र झाली आहे. या युद्धादरम्यानच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की पोलंडला पळून गेल्याचा दावा रशियाने केला होता . त्यावर झेलेन्स्की यांनी आपले लोकेशन शेअर करत किव्हमध्येच असल्याचे स्पष्ट केले.
झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी लपलेलो नाही, मी कोणालाही घाबरत नाही. कीव्हमधील बोकोव्हा स्ट्रीटवर मी राहतो. सोमवारचा दिवस माझ्यासाठी नेहमीच कठीण असतो. आपल्या देशात युद्ध सुरू आहे. त्यामुळे आमच्यासाठी प्रत्येक दिवस आता सोमवार आहे. या युद्धात जिंकणार असल्याचा युक्रेनचा निर्धार कायम आहे. रशियाला देव माफ करणार नाही. माफीऐवजी न्याय होईल. हल्लेखोराचा धाडसीपणा हा पश्चिमेच्या देशांना स्पष्ट संकेत आहे की, रशियाविरुद्ध निर्बंध पुरेसे नाहीत, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
दोन्ही देशात सुरू असलेले हे युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक असेल तोपर्यंत आपण कीव्हमध्येच राहणार असं सांगत झेलेन्स्की यांनी आपल्या नागरिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.









