मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कामाला लागा असे आदेश दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते बोलले तर ठीक मात्र मी बोलले तर त्रास झाला, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असून देखील काँग्रेस कार्यकर्त्यांची कामं होत नसल्याची खंत यावेळी नाना पटोले यांनी बोलून दाखवली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. म्हणाले, मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही, असा टोला देखील नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना लगवावला.
आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात. आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं. कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,असा टोला नाना पटोले यांनी अजित पवार यांना लगावला.
काँग्रेस मोठी होती हे त्यांना खपत नाही. त्यासाठी पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना ताकदीनं उत्तर द्यायचं आहे. त्रासाला ताकद बनवा,आत्मविश्वासानं पुढे जा आणि संघटना बांधणीवर भर द्या. २०२४ मध्ये काँग्रेस राज्यात स्वबळावर येणार, असं पटोले यावेळी म्हणाले.
Previous Articleकेरळमध्ये ‘झिका’ व्हायरसचे 15 रुग्ण
Next Article वेंगुर्ले सागररत्न मच्छीमार्केटचे लोकार्पण








