पुणे \ ऑनलाईन टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला असल्याचे विधान केलं होतं. राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. “त्यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे” असा सल्ला शरद पवार यांनी राज ठाकरेंना दिला होता. त्यांच्या याच टीकेला आज राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज ठाकरेंना पत्रकांरानी शरद पवारांच्या सल्लाविषयी विचारण्यात आले. यावर राज ठाकरे म्हणाले की, मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं. एका चॅनलला मी मुलाखत दिली. गेल्या ७५ वर्षांमध्ये आपण काय कमावलं आणि गमावलं याचा उहापोह त्यात होता. मी त्यांना हेच सांगितलं की आपण वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का? या अनुषंगाने माझी भूमिका होती”, असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
जात ही गोष्ट हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे. १९९९ साल जर आपण पाहिलं, तर त्याआधीपर्यंत राज्यात जातीपाती होत्याच. पण ९९ सालानंतर जातीपातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेष वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष जास्त वाढला. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. बोललो फक्त मी. या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत, याचा अर्थच कळला नाही. माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचं, बाकीचं घ्यायचं नाही असं करता येणार नाही, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राज ठाकरेंच्या ‘त्या’आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवारांचे उत्तर
राज ठाकरेंच्या आरोपावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये आज पुण्यात प्रत्युत्तर दिलं आहे. लोकं काहीतरी बोलून जातात त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे नेमके काय म्हणाले होते ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी राज ठाकरे यांना हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरु झालं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाला आहे.