तळाशिलची सागरकन्या करतेय भर समुद्रात मासेमारी : अकरावीतील लिखिता करतेय नौकेचे सारथ्य : मासेमारीतील तिचे कौशल्य ठरतेय कौतुकाचा विषय : अपंग वडिलांना देतेय मदतीचा हात
परेश सावंत / आचरा:
घरचा वारसदार म्हणून नेहमीच मुलाकडे पाहिले जाते. माता-पित्यांची स्वप्ने, कौटुंबिक कर्तव्ये आणि संसाराचा रहाटगाडा पुढे हाकण्याचे काम मात्र मुलगाच पूर्ण करू शकतो, या आजवरच्या समाजधारणेला छेद देण्याचे काम एका युवतीने केले आहे. सिंधुदुर्गात समुद्र आणि खाडीमध्ये मासेमारी करताना महिला दिसून येतात. परंतु तळाशिलमधील या युवतीने त्याही पुढे जाऊन मासेमारी नौकेचे सारथ्यच आपल्या हाती घेतले आहे. समुद्राच्या लाटांना चिरत सुसाट वेगाने मार्गक्रमण करणाऱया युवतीचे मासेमारीतील कौशल्य कौतुकाचा विषय ठरत आहे. ही युवती आहे, अकरावीत शिकणारी लिखिता भूपाल मालंडकर.
मच्छीमार बांधवांबरोबर महिलांचाही सहभाग नेहमीच पाहतो. किनाऱयावर आलेल्या नौकेतील जाळय़ातून मासे काढण्याचे काम असो, मासे बाजारात नेउढन विकण्याचे काम असो किंवा जाळी विणण्याचे काम, अशात नेहमीच महिलांचा वावर दिसतो. मात्र, तळाशिलची लिखिता ही मात्र किनाऱयावरच न राहता चक्क पित्यासमवेत मासेमारीला समुद्रात जाते. मासेमारी पातीच्या (होडी) इंजिनाचा ताबा घेत इंजिनाची मूठ (हॅन्डल) हातात घेऊन एखाद्या तरबेज मच्छीमाराप्रमाणे समुद्रात पात (होडी) चालवित सारथ्य करताना दिसते. समुद्रात इतर मच्छीमारांचे लक्ष वेधून घेणारी लिखिता चर्चेचा विषय बनली असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. काही माणसे आपल्या समाजाला नवी दिशा देण्याबरोबरच समाजात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी झटत असतात. लिखिता ही त्यापैकी एक. मच्छीमार समाजातील युवा पिढीचे नेतृत्व करणाऱया, शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जात स्वतः घडत आहे. मुलींमध्ये मुळातच सर्व आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्याची ताकद असते. त्यामुळे ही ताकद ओळखून मुलींनी मार्ग काढत जीवन जगण्याचा संदेश तळाशिलची ही कन्या देत आहे.
अन् तिने स्वीकारले पातीचे सारथ्य
तळाशिल किनाऱयावर पूर्वी मर्यादित प्रमाणात मासेमारीच्या पाती होत्या. त्यामुळे एका-एका पातीवर वाडीतील मच्छीमार मिळून मासेमारीला जात असत. अलिकडच्या काळात मात्र बहुतांश सर्वांकडेच मासेमारीच्या पाती तयार झाल्या. अशातच मासेमारीसाठी पातीवर स्थानिक खलाशी मिळणे दुरापास्त होउढ लागले. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मासेमारीवर अवलंबून असल्याने पायाला अपंगत्व असूनही लिखिताचे वडील भूपाल हे एकटेच समुद्रात मासेमारीला जात असत. एकटय़ानेच जाळी ओढणे, पात चालविणे अशी कामे करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. समुद्रातून मासेमारी करून आल्यावर पुन्हा जाळय़ातून मासे काढून मासे विक्रीसाठी सुमारे 25 किमी दूर मसुरे बाजारपेठ गाठणे त्यांचे नित्याचेच बनले होते.
वडिलांचे कष्ट स्वस्थ बसू देईनात
शाळेत शिकणारी लिखिता पित्याचे हे अपार कष्ट पाहत होती. किनाऱयावर वडिलांसोबत काम करताना भर समुद्रात मासेमारीला वडिलांचे एकटेच जाणे, माशांसाठी समुद्रात टाकलेली जाळी एकटय़ाने ओढणे तिला स्वस्थ बसू देत नव्हते. आपलीही वडिलांना किनाऱयावरील मदतीबरोबर समुद्रातही मदत व्हावी, असे तिला सतत वाटत असे म्हणूनच तिने वडिलांसोबत समुद्रात जाण्याचा निर्धार केला. त्यासाठी तिने वडिलांनाही राजी केले व खाडीत होडी चालविण्याचा अनुभव गाठीशी घेऊन ती समुद्रात मासेमारीच्या पातीतून जाऊ लागली. सुरुवातीला जाळी खेचणे, जाळय़ातून मासे बाजूला काढणे अशी कामे करता-करता हळूहळू लिखिताने इंजिनाचा ताबाही घेतला. आज ती तरबेज तांडेलाप्रमाणे समुद्रात मासेमारी पात हाकते. आजूबाजूला मासेमारीसाठी आलेले मच्छीमारही तिच्याकडे कुतुहलाने पाहतात. अशावेळी आपण वडिलांच्या कामात हातभार लावू शकत असल्याचा आनंद सतत तिच्या चेहऱयावर विलसत असतो.
लिखिताला व्हायचंय कॉम्प्युटर इंजिनिअर
नेहमी हसतमुख असणारी लिखिता, उंचीने कमी असली, तरी तिची स्वप्ने ध्येयाकडे भरारी घेणारी दिसतात. लिखिता जशी कामात तरबेज, तशीच शिक्षणातही हुशार आहे. मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये शिक्षण घेत नुकतीच दहावीच्या परीक्षेत तिने यश संपादन करत 70 टक्के गुण मिळविले असून आता तिने सायन्स शाखेत प्रवेश घेतला आहे. तिने कॉम्प्युटर इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. आताच्या लॉकडॉऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षण घेताना कुठेही वडिलांच्या मदतीमध्ये खंड पडू दिला नाहे. तिने कामाची वेळ व अभ्यासाचे योग्य नियोजन केले आहे.









