नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. जवळपास दीड तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिक भेट झाल्याचीही चर्चा होती. पंतप्रधान भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांना मी काही नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो असं उत्तर दिलं.
उद्धव ठाकरे यांना मोदींसोबत तुमची वैयक्तिक भेट झाली का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की,पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली. सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं अस होत नाही. पंतप्रधानांना भेटणं यात गैर काय? मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो, आपल्याच पतंप्रधानांची भेट घेतली. माझ्या सहकाऱ्यांना आत्ताही मी पुन्हा जाऊन त्यांना भेटायचं आहे असं सांगितलं तर त्यात चुकीचं काय?, असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
यासोबतच महाराष्ट्राचे जीएसटीचे २४ हजार ३६० कोटी रुपये केंद्राने द्यावेत याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली.