माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी
मुंबई \ ऑनलाईन टीम
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असा गौप्यस्फोट केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणेंच्या या वक्तव्यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रितिक्रिया देत चांगलाच समाचार घेतला आहे. हा ‘जावईशोध’ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, मी निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच मला माहित आहे. स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे हे माझ्या रक्तात नाही. नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जबाबदारी सोपविल्यापासून आजपर्यंत कधीही त्यांनी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला नाही. त्यांच्याच पाठबळामुळे नगरविकास विभागात अनेक चांगले निर्णय घेता आले. तसेच अनेक चांगल्या योजना राबविण्याचे काम सुरू आहे.
नारायण राणे ‘साहेब’ हे स्वत: मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना एक नक्कीच माहित असणे अपेक्षित आहे की कोणत्याही खात्याचा धोरणात्मक निर्णय जो राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असतो तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय मंजूर होत नाही. माझ्याच नव्हे तर कोणत्याही विभागाचे धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा होऊनच घेतले जातात व ते योग्यच आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. नारायण राणे हे आता केंद्रीय मंत्री असून त्यांच्या खात्याचे धोरणात्मक निर्णय हे पंतप्रधानांच्या संमतीशिवाय नक्कीच मंजूर होत नसावेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
नारायण राणे काय म्हणाले होते ?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, “एकनाथ शिंदे जरी नगरविकास मंत्री असले तरी ते केवळ सहीपुरते आहेत. एकनाथ शिंदे मातोश्रीशिवाय एकही फाईल सही करु शकत नाहीत. त्यामुळे ते बिचारे कंटाळलेत. अडचणीत सापडल्यासारखं आहे. मार्ग शोधत आहेत. एक दिवस फोन करेन आणि मार्ग दाखवेन,”