मुंबई पोलिसांवर ओढले ताशेरे
ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आंदोलन केले. आंदोलन सुरु असताना अचानक कर्मचारी आक्रमक झाले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला. यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनीही या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मुंबई पोलिसांवर (mumbai police) ताशेरे ओढलेत.
“एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर आंदोलक प्लॅनिंग करून जात असतील, तर तेव्हा पोलीस काय करत होते. आंदोलन होणार आहे हे पोलिसांना माहित नसणे हे संशयास्पद आहे. एवढ्या मोठ्या आंदोलनाची पोलिसांना कल्पना नसणे, हे पोलिसांचं अपयश आहे. पोलिसांच्या आणि गुप्तचर यंत्रणांच्या या अपयशाची चौकशी झाली पाहिजे. माध्यमांना हे आंदोलन होणार आहे हे माहित होते पण पोलिसांना का माहित होत नाही. माध्यमांचे कॅमेरामॅन त्याठिकाणी पोहोचले पण पोलीस उशीरा पोहोचले, याचं कारण काय?” असा सवाल सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनानंतर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाचं दृश्य आपण सगळ्यांनी पाहिलं, ते दृश्य अतिशय भयावह होतं. एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर आंदोलन होतं आणि पोलीस यंत्रणेला याची माहिती नसावी हे त्यांचं अपयश आहे. त्यामुळे याची प्रकरणाचीचौकशी झालीच पाहिजे,” ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. तसेच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी या हल्ल्यांनंतर प्रतिक्रिया देताना शुक्रवारी जी घटना घडली त्या घटनेचे मास्टरमाईंड नागपुरात बसलेले आहेत, असा आरोप केला होता. त्यावर बोलताना “आपण अशा लोकांच्या आरोपांना उत्तर देत नाहीत,” असं फडणवीसांनी म्हटल आहे.








