आजपासून मीटर बसविण्यास होणार प्रारंभ
प्रतिनिधी / पणजी
पर्यटक टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्याचे काम आज गुरुवार दि. 20 मे पासून सुरु करण्यात येणार असून तो मीटर बसवल्याशिवाय परवान्याचे नूतनीकरण होणार नसल्याचे वाहतूक खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मीटर बसवल्याशिवाय टॅक्सीवाल्यांसमोर कोणताही पर्याय राहिलेला नाही.
उच्च न्यायालयाने हे मीटर बसवण्याचे निर्देश काही दिवसापूर्वी दिले होते. त्यासाठी मुदत निश्चित केली होती. ती वाढवून देण्यात आल्यानंतर आता वाहतूक खात्याने मीटर बसवण्याची कार्यवाही करण्याचे ठरविले आहे. उत्तर गोवा जिह्यात 2 तर दक्षिण गोवा जिह्यात 2 अशा एकुण 4 ठिकाणी हे मीटर बसवण्यात येणार असून त्याची माहिती टॅक्सीचालकांना- मालकांना देण्यात आल्याचे वाहतूक खात्याच्या सुत्रांनी सांगितले. हे मीटर बसवणे आता बंधनकारक असून त्यासाठी कोणतीही हयगय खपवून घेणार नसल्याचा इशारा वाहतूक खात्याने दिला आहे. वाटेल तसे भाडे दर आकारणी करुन स्थानिकांना, पर्यटकांना लुटणाऱया काही टॅक्सीचालक – मालकांना त्यामुळे चाप बसणार आहे.
मीटरसाठी 30 जूनपर्यंत मुदत
डिजिटल मीटर बसवण्याची मुदत 30 जूनपर्यंत देण्यात आली आहे. त्या मुदतीत मीटर बसवण्यात अपयशी ठरणाऱया टॅक्सींना पुढील सूचना न देता परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे वाहतूक खात्याने म्हटले आहे. यासंदर्भात वाहतूक खात्याने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वीज मीटरचा एकुण खर्च रु. 11 हजारच्या आसपास येणार असल्याची माहिती अधिसूचनेतून देण्यात आली आहे. कोरोना महामारीचे संकट व चक्रिवादळाचे परिणाम लक्षात घेवून मीटर बसवण्याचे काम 6 महिन्यांनी पुढे ढकलण्याची मागणी टॅक्सीचालक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. अनेक टॅक्सीचालक – मालक कोरोनाबाधित आहेत. शिवाय अनेकांना व्यवसाय होत नाही. तेव्हा सदर मीटरची कार्यवाही पुढे ढकलावी असे संघटनेने म्हटले आहे.









