अंबवडे बुद्रुक येथील प्रकार ; घरात मीटर न बसवताच जाधव कुंटुंबियांवर बिलांचा भडीमार
वार्ताहर / परळी
कोरोना काळात सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय म्हणजे वीज वितरण विभागाच्या वाढीव बिलांचा झालेला अतिरेक होय. कोणाला किती लाईट बील आले अन् कोणी किती वीज वापरली याचा झांगडगुत्ता अजून सुटलेला नाही. मात्र अंबवडे बुद्रुक (ता.सातारा) येथील बळीराम जयराम जाधव वीज महावितरणाचे ग्राहकच नाहीत तरीदेखील त्यांना बिल येण्याचा अजब प्रकार घडत आहे. त्यामुळे वीज वितरणच्या अजब कारभाराची चर्चा सुरु आहे.
परळी खोऱ्यातील अंबवडे बुद्रक हे छोटेसे गाव आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी वीज मीटर न बसवता आलेल्या बिलांची चर्चा रंगताना दिसत आहे. बळीराम जाधव यांनी जवळपास एक वर्षापूर्वी घरगुती मीटरसाठी परळी येथे अर्ज केला होता. त्यानंतर जानेवारी 2020 या महिन्यात अधिकाऱ्यांचे परिक्षणही झाले. तद्नंतर कोरोनामुळे वितरण विभागाचे काम बंद होते. तरी देखील जाधव यांनी 8 जून 2020 रोजी दिलेले कोटेशन जमा केले. आता आज वीज कनेक्शन येईल, उद्या येईल, अशी गेल्या काही महिन्यांपासून घरात वीज कनेक्शन येण्याची वाट पहात आहेत.
मात्र, कनेक्शन नसून अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे गरीब जनतेच्या खिशाला कात्री बसत आहे. जाधव कुंटुंबियांना वीज वितरण विभागाने सप्टेंबरमध्ये कागदोपत्रीच कनेक्शन बहाल केले. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून 19 ऑक्टोबरचे बिल 150 रुपये व 19 नोव्हेंबरचे बिल 460 रुपये अशी दोन बिले कनेक्शन नसताना जाधव यांना दिली गेली आहेत. याची लेखी तक्रार केली असून अद्याप कोणतीही हालचाल झाली नसल्याचे बळीराम जाधव यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगीतले.
साहेब, मीटर नाही तर बिल कशाचे ?
बळीराम जाधव यांनी घरगुती मीटरची मागणी जवळपास एका वर्षभरापूर्वी केली. सर्व देयक रक्कम ही भरली. कोरोनामुळे थोडा उशीर होणार असल्याने ते देखील जाधव यांनी गृहीत धरले होते. मात्र थेट बिलेच सुरु करण्यात आल्याने आता या प्रकाराला काय म्हणायचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.









