बेळगाव/प्रतिनिधी
मिसळ हा अनेक खवय्यांच्या आवडीचा पदार्थ विशेषत: कोल्हापुरी मिसळ म्हटले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चरचरीत आणि चटकदार अशा मिसळच्या अनेक नमुन्यांची एकत्रित पर्वणी घेऊन आलेल्या मिसळ महोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला.
भाग्यनगर येथील रामनाथ लॉन्ज येथे हा महोत्सव भरविण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी ग्राहकवर्गाने याला उत्तम प्रतिसाद दिला. या ठिकाणी विविध शहरातील मिसळीचे वेगवेगळे नमुने उपलब्ध आहेत. त्यामुळे खवय्यांना वेगवेगळय़ा चवींचा आस्वाद घेण्याची संधी देखील आहे. कोल्हापूर, नाशिक, पुणे, गडहिंग्लज यासह इतर ठिकाणी मिळणाऱया नामवंत मिसळींचे नमुने ग्राहकांना तृप्त करणारे आहेत. त्याचबरोबर इतर खाद्यपदार्थ आणि रसना तृप्तीचे स्टॉल्स येथे मांडण्यात आले आहेत. दि. 5 जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.









