पर्रा येथील चर्चच्या दफनभूमीत अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ म्हापसा
वेर्ला काणकाचे सरपंच, काँग्रेसचे कार्यकर्ते तथा प्राईम मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक मिल्टन मार्कीस यांच्या पार्थिवावर काल दुपारी शोकाकूल वातावरणात पर्रा येथील चर्चच्या दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोरगरिबांना मदत करणारे, काँग्रेसने एक नेते व सर्वांचा एक जवळचा मित्र गमावला असल्याची भावना यावेळी उपस्थित असणाऱया मान्यवरांनी व्यक्त केली.
सकाळी मिल्टन मार्कीस यांचा मृतदेह त्यांच्या काणका येथील निवासस्थानी आणला असता त्यांचे कार्यकर्ते व मित्रांनी पार्थिवावने दर्शन घेतले. उपस्थितांनी त्यांच्या पत्नी व्हेनेसा मार्कीस यांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. यात कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, राजेंद्र घाटय़े, बाबी बागकर, मोहन दाभाळे, बार्देश भंडारी समाजाचे अध्यक्ष नारायण मांद्रेकर, दत्ताराम पेडणेकर, आनंद पांढरे, सागर लिंगुडकर, बाळा नाईक, नितीन लिंगुडकर, विनेश साळगावकर, चंदन मांद्रेकर, प्रताप परब, वासुदेव कोरगांवकर, अमिता कोरगावकर, अनिलकुमार नागवेकर, सुदेश किनळेकर, रुद्रेश पांढरे, उदय पांढरे, ऐश्वर्या साळगावकर, लक्ष्मण कोरगावकर, राजू शिरोडकर, हनुमंत गोवेकर, हनुमंत नाईक, सुरेंद्र गोवेकर आदींनी पार्थिवाचे दर्शन घेतले.
मार्कीस यांच्या जाण्याने काँग्रेसचे नुकसान : गिरीश चोडणकर
मिल्टन मार्कीस यांच्या निधनाने गोवा प्रदेश काँग्रेसला खूप दुःख झाले. ते एक उत्कृष्ट समाजसेवक, काँग्रेसचे ‘ग्रासरूट’ कार्यकर्ते होते. सुमारे 35 वर्षे त्यांनी पंचसदस्य, सरपंचपदी काम पाहिले. एनजीओमार्फत त्यांनी कार्य केले. गरीब लोकांना मदत करताना त्यांना समाधान मिळायचे. जिल्हा पंचायत सदस्य निवडणुकीसाठी त्यांनी अहोरात्र काम केले. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचे नुकासान झाल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी श्रद्धांजली वाहताना सांगतिले.
मार्कीस यांचे कार्य न विसरण्यासारखे : मायकल लोबो
मिल्टन मार्कीस हे नामवंत समाजसेवक व एक धडाडीचे सरपंच. त्यांनी चांगले काम केले. ते गरिबांसाठी खूप झटले. मात्र आज ते आमच्यात नाही. त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे समाजकार्य न विसरण्यासारखे आहे. त्यांची उणीव आम्हाला प्रत्येक कार्यात भासेल. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व हे दुःख झेलण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो, अशी भावना कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केली.
मार्कीस सर्देव गरिबांसाठी झटले : विजय सरेदासई
मिल्टन मार्कीस आमचा खांबा होता. गोवा फॉरवर्डचे ते पूर्वीचे प्रवक्ते होते. शिवोली मतदारसंघात प्रचारासाठी आम्ही खूप वेळा एकत्रित वेळ घालविला. आज त्यांच्या निधनाने खूप वाईक वाटते. ते कधीही वाकले नाही. जीवनात ते खूप झटले. गोरगरिबांना सदैव त्यांनी मदत केली. त्यांचे समाजकार्य सदैव सर्वांच्या मनात राहील, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
आपल्या विजयात मार्कीस यांचा मोलाचा वाटा : विनोद पालयेकर
आपल्या विजयासाठी मिल्टन मार्कीस अहोरात्र झटले. आपल्या विजयात मार्कीस यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे उपकार मरेपर्यंत विसरणार नाही. आपल्या भावासारखा मित्र आपल्यातून दूर गेला आहे. आपल्या बरोबर ते व्यवसायात पार्टनरही होते. एका खुल्या दिलाचा माणूस गेला, असे आमदार विनोद पालयेकर म्हणाले.
मार्कीस यांचे सर्वांना मोलाचे सहकार्य लाभले : जयेश साळगावकर
अंत्यसंस्कारावेळी मोठय़ा संख्येने लोक आले व त्यांच्या डोळय़ात अश्रू आले. यावरूनच मिल्टन मार्कीस यांची खरी ओळख आम्हाला पहायला मिळाली. कोणीही आजारी असला तर ते स्वतः त्याला आर्थिक मदत देऊन मदत करीत असे. आपल्या मतदारसंघातही त्यांनी आपल्यास सहकार्य केले होते. त्यांची उणीव सर्वांना सदैव भासेल, असे आमदार जयेश साळगावकर म्हणाले.
विकासकामे पूर्ण केल्यास खरी श्रद्धांजली ठरेल : दत्ताराम पेडणेकर
व्यावसायिक असूनही स्कूटर घेऊन गोरगरिबांच्या घरी पोहोचणारे ते नेते होते. शिवोली मतदारसंघात तसेच वेर्ला काणक्यात त्यांची काही विकासकामे अपुरी राहिली आहेत ती पूर्ण करणे s हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे समाजसेवक दत्ताराम पेडणेकर म्हणाले.
महिलांना सर्देव पाठिंबा दिला : ऐश्वर्या साळगावकर
मिल्टन मार्कीस यांनी विकास कामांना सदैव प्रोत्साहन दिले आहे. महिलांना त्यांनी सदैव पाठिंबा दिला आहे. आम्ही एका चांगल्या सरपंचाला मुकलो, असे बायोडायव्हर्सिटीच्या अध्यक्षा ऐश्वर्या साळगावकर म्हणाल्या.
राजकारण म्हणजे नाटकातले नट- दयानंद मांद्रेकर
आपण दोनवेळा मार्कीस यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. राजकारणात कोणीही कायमचा विरोधी किंवा सत्ताधारी नसतो. ते नाटकातील पात्र असते. नाटक संपले की सर्व काही संपले. मिल्टन मार्कीस यांच्या जाण्याने एक चांगला नेता गमावला, असे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले.
यावेळी गजानन लिंगुडकर, राजू शिरोडकर, राजेंद्र घाटे, दीपक धारगळकर, सुधीर कांदोळकर, विजय भिके, चंदन मांद्रेकर, बाबी बागकर, अनिलकुमार नागवेकर, प्रताप परब, पंचसदस्य बाळा नाईक, नितीन लिंगुडकर, तुषार टोपले, आनंद पांढरे, सुदेश किनळेकर यांनी श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया व्यक्त केल्या.









