वृत्तसंस्था/ चंदीगड
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी तसेच भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांचे रविवारी वयाच्या 85 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक चिरंजीव आणि तीन कन्या असा परिवार आहे.
मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाल्याने मोहालीच्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना चाचणीत त्या पॉझिटिव्ह ठरल्याने त्यांच्यावर जवळपास महिनाभर वैद्यकीय इलाज सुरू होता. मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. निर्मल कौर यांनी शेवटपर्यंत कोरोनाशी कडवी झुंज दिली. हॉस्पिटलमध्ये असल्याने निर्मल कौर यांच्या अंत्ययात्रेला मिल्खा सिंग उपस्थित राहू शकले नाहीत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी निर्मल कौर यांना आदरांजली वाहिली आहे. निर्मल कौर या पंजाब शासनाच्या क्रीडा खात्याच्या माजी संचालिका होत्या.









