तक्रार नोंद करण्यास महिला पोलिसस्थानकाचा नकार
प्रतिनिधी /पणजी
वासनाकांड (सेक्स स्कॅन्डल) प्रकरणी माजी मंत्री व आमदार मिलिंद नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यास पणजीतील महिला पोलीस स्थानकाने नकार दर्शवला असून तशा आशयाचे पत्र तक्रारदार संकल्प आमोणकर यांना पाठवले आहे. त्यामुळे नाईक यांना पोलीस खात्याने क्लिनचिट दिल्याचे समोर आले आहे.
आमोणकरांनी दिलेल्या तक्रार, पुरावे यावरून दखलपात्र गुन्हा नोंदवता येत नाही. वास्को येथील एसडीपीओ अर्थात उपविभागीय पोलीस अधिकाऱयांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली असून संबंधित पीडित महिलेने तक्रारीवरून सर्व आरोप चुकीचे असल्याची जबानी दिली आहे. त्यामुळे सदर तक्रार आता फाईलबंद करण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
दखलपात्र गुन्हा नोंदविण्याचे कारण नाही
आमोणकर यांनी वासनाकांड प्रकरणी 15 डिसेंबर 2021 रोजी पणजी महिला पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. त्यात काहीच तथ्य नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे. पीडित महिलेने मुरगाव पोलीस स्थानकात जाऊन आमोणकरांच्या तक्रारीतील आरोपांचे खंडन केले होते. त्यामुळे त्या तक्रारीत दखलपात्र गुन्हा नोंद करण्यासारखे काहीच नसल्याचे स्पष्टीकरण महिला पोलीस स्थानकातून देण्यात आले आहे.
हे वासनाकांड प्रकरण 2021 डिसेंबर महिन्यात गाजले होते. गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर व आमोणकर यांनी या संदर्भात नाईक यांच्यावर आरोप केले होते. आता आमोणकर पुढे कोणता पवित्रा घेतात यावरच सदर प्रकरणाचे भवितव्य अवलंबून आहे.
भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता
आज बुधवारी भाजपच्या विधानसभा निवडणूक उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. दुसऱया बाजूने वासनाकांड प्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या आमदार मिलिंद नाईक यांना पोलिसांनी काल मंगळवारीच ‘क्लिन चिट’ दिल्याने त्यांना थोडा दिलास मिळाला आहे. मात्र त्यांना उमेदवारी देता यावी, म्हणूनच ही क्लिन चिट देण्यात आल्याची टीका सरकारवर झाली. एकंदरीत परिस्थितीत मिलिंद नाईक यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वाढली असून त्यासाठीच त्यांना क्लिन चिट देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.









