प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी मिऱया-नागपूर महामार्गाच्या दुपदरीकरणाची कार्यवाही सुरू असताना रत्नागिरी शहरानजीक टिआरपी ते रत्नागिरी रेल्वेस्थानक हद्दीपर्यंत या मार्गाला खेटून असलेल्या मोकळय़ा जागेत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलेले आहे. त्याची गंभीर दखल घेत रत्नागिरी सार्वजनिक बांधकामच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूर पत्र धाडले आहे. त्या अनधिकृत रचनांमुळे प्रकल्प राबवताना येणाऱया अडचणी आणि यामुळे प्रकल्पात विलंब होऊ शकतो. त्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे सूचित केले आहे.
रत्नागिरी मिऱया-नागपूर महामार्गालगत रत्नागिरी शहरानजिकच्या साळवीस्टॉप ते एमआयडीसी दिवस-रात्र उभी राहत आहेत. त्या अनधिकृत बांधकामांच्या बाजारपेठेला नेमका वरदहस्त कोणाचा? याबाबत चर्चेला पेव फुटलेले आहे. महामार्गाचे दुपदरीकणाचे काम सुरू झाल्यानंतर लगतच्या बाधित क्षेत्रात असलेली सर्व बांधकामे हटणार आहेत. पण शहरानजीकच्या साळवी स्टॉपपासून ते जे.के.फाईल्सपासून त्याही पुढे टीआरपी अगदी एमआयडीसी-पॉवरहाऊस कुवारबावच्या उतारापर्यंत भलतीच बांधकामे या मार्गाला खेटून उभी राहू लागली आहेत. जेसीबी लावून त्या जागेचे सपाटीकरण, चिऱयांचे ढीगारे व उभी राहणारी बांधकामे, अनेक शेडस, सर्व्हीस रॅम्पही बांधण्यात आलेले आहेत. या बाबतचे वृत्त प्रसिध्द होताच त्याची गंभीर दखल येथील सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण) यांनी घेतली आहे.
त्या बांधकामांच्या अतिक्रमाणांबाबत पुढील कारवाईसाठी तातडीने महामार्ग प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडे पत्र पाठवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या महामार्गालगतच्या नवीन अनधिकृत बांधकामांच्या कामांबाबत काही तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांमुळे प्रकल्प राबवताना त्रास होऊ शकतो. तसेच यामुळे प्रकल्पात अभूतपूर्व विलंब होण्याची शक्यता आहे. भविष्यात येणाऱया या अडचणी टाळण्यासाठी नोटीस बजाविणे आणि या प्रकारच्या अतिक्रमणांवर अनधिकृत बांधकामे / संरचनांची पाहणी केली जावी अशा पत्राद्वारे सूचना प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडे करण्यात आली आहे.
अनधिकृत बांधकामांकडे मिरजोळे ग्रामपचायतकडूनही वेधले लक्ष
रत्नागिरी मिऱया-नागपुर राष्ट्रीय महामार्गाला रेल्वे स्टेशन हद्दी पासून टीआरपी पर्यंत रस्त्यालगत अनधिकृत बांधकाम होत असल्याबाबतचे मिरजोळे ग्रामपंचायतीच्यावतीनेही सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण) रत्नागिरी यांचे लक्ष वेधण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत मिरजोळे, कार्यक्षेत्रामधुन आपल्या अधिपत्याखालील असलेला रत्नागिरी मिऱया-नागपुर राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या महामार्गालगत ग्रुप ग्रामपंचायत मिरजोळे हद्दीमध्ये रेल्वे स्टेशन हद्दी पासून ते टीआरपी पर्यंत या 15 दिवसांत मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत पक्की बांधकामे चालू आहेत. त्याचा फार मोठा त्रास वाहतूकीला होत आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघात होऊन जिवितहानी होण्याची शक्यता मोठय़ा प्रमाणावर निर्माण झालेली आहे. तरी या ठिकाणच्या महामार्गाची आपल्या विभागाकडून प्रत्यक्ष पहाणी व्हावी. या ठिकाणी होणारी अनधिकृत बांधकामे काढून टाकणेबाबतची कारवाईकडे लक्ष वेधले.









