नैर्त्रुत्य रेल्वेने पॅसेंजरसाठी सुरू केली तयारी : रेल्वे विभागाला पाठविले पत्र
प्रतिनिधी /बेळगाव
तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा पॅसेंजर रेल्वे रूळावर येणार आहेत. मिरज-हुबळी तसेच मिरज-कॅसलरॉक या मार्गावर पॅसेंजर धावणार आहेत. नैर्त्रुत्य रेल्वेने पॅसेंजर सुरू करण्यासाठी सर्व तयारी केली असून, रेल्वे विभागाकडून हिरवा कंदील मिळताच तारीखही जाहीर केली जाणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
हुबळी-मिरज मार्गावर पॅसेंजर रेल्वे धावत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या मार्गावर दररोज नोकरदार, शेतकरी, विपेते, व्यापारी प्रवास करीत असतात. त्यामुळे पॅसेंजर सुरू करण्याची मागणी होत होती. नैर्त्रुत्य रेल्वेने पॅसेंजर सुरू करण्याबाबत रेल्वेच्या झोनल विभागाकडे परवानगी मागितली आहे. दि. 19 ऑगस्ट रोजी परवानगीसाठी पत्र पाठविण्यात आले आहे. झोनल विभागाकडून परवानगी मिळताच पॅसेंजर धावू लागणार आहेत.
सकाळी 10 वा. हुबळी येथून निघालेली पॅसेंजर सायं. 5.30 वा. मिरज तर दुपारी 12.55 वा. मिरज येथून निघालेली रेल्वे रात्री 8.40 वा. हुबळी येथे पोहोचेल. तर मिरज-कॅसलरॉक ही सायंकाळी 5.25 वा. मिरज येथून निघालेली रेल्वे रात्री 11.40 वा. कॅसलरॉक येथे पोहोचेल. सकाळी 5.40 वा. कॅसलरॉक येथून निघालेली पॅसेंजर सकाळी 11.35 वा. मिरज येथे पोहोचेल, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. लवकरच या पॅसेंजर सुरू होणार असल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय थांबणार आहे.
बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर धावणार मिरजपर्यंत
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव-मिरज या मार्गावरील पॅसेंजर वाहतूक बंद केली होती. त्यामुळे बेळगावमधून शेडबाळपर्यंत पॅसेंजर धावत होती. परंतु यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने मिरजपर्यंत रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत होते. या मागणीला यश आले असून, नव्या वेळेनुसार ही पॅसेंजर लवकरच धावणार आहे. सकाळी 10 वा. बेळगावमधून निघालेली पॅसेंजर दुपारी 1.30 वा. मिरजला तर दुपारी 2.30 वा. मिरज येथून निघालेली पॅसेंजर सायं. 6 वा. बेळगावमध्ये पोहोचेल, असा प्रस्ताव नैर्त्रुत्य रेल्वेने ठेवला आहे.









