प्रतिनिधी / मिरज
शहराच्या सुशोभीकरणाला चालना मिळावी, यासाठी लोकनिती सोशल फाऊंडेशनने उभारलेल्या ‘आय लव मिरज’ सेल्फी पॉइंटची अज्ञात समाज कंटकांनी तोडफोड केली असल्याचा आरोप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सेल्फी पॉईंटमध्ये आकर्षक असलेले बदाम आणि त्याच्या लाईट्स फोडुन पाण्यात टाकून देण्यात आल्याने या कृतीचा मिरजकर नागरिकांतून निषेध करण्यात येत आहे. लोकनिती फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी याबाबत पोलीसात तक्रार दिली असून, सेल्फी पॅाइंटची तोडफोड करणाऱ्याला पकडून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील गणेश तलाव येथे दोनच दिवसांपूर्वी या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन झाले होते. या पॉंइंटवर सेल्फी काढण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरीकांची गर्दीही होऊ लागली होती. मात्र, सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी या सेल्फी पॉइंटची तोडफोड केली. आय लव मिरजच्या मध्यभागी असलेले आकर्षक बदाम फोडून व त्यातील लाईट्स उचकूट काढून तलावाच्या पाण्यात फेकून देण्यात आले होते. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून, गणेश तलाव परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपींचा शोध घेतला जात आहे.








