संग्राम कदम /आळसंद
कोरोना लढाई जिंकले आणि नोंदणीत हरले अशी मिरज सिव्हील हॉस्पिटल सारख्या मान्यवर संस्थेची अवस्था झाली आहे. खानापूर तालुक्यातील वाझर येथील एका कोरोना रुग्णाच्या पतीला उपचार केलेले नसतानाही त्याच्या कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद गावाकडे पाठवून सिव्हिल हॉस्पिटलने आपल्या कारभाराचा नमुनाच दाखवून दिला आहे.
कोरोना नोंदीबाबत किती गंभीर चूक व्हावी याला धरबंद राहिलेला नाही. गेले दोन वर्षे झाले देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मृत्यूची संख्या बरीच आहे. काही ठिकाणी कुंटुब उध्वस्त झाले आहेत. त्यामुळेच सरकारने कोरोनाने बळी गेलेल्या कुंटुबाच्या वारसांना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. आरोग्य विभागाने याची माहिती गोळा करण्यास सुरुवात करून ती माहिती आपल्या विभागाकडे पाठवून याची खातरजमा करून पुन्हा ग्रामपंचायतीकडे पाठवली आहे. मात्र त्यातून भलताच गोंधळ उडतो आहे. खानापूर तालुक्यातील वाझर येथील एका कोरोना रुग्णाच्या पतीला उपचार केलेले नसताना ही त्याची नोंद मृत्यू अशी पाठवून सिव्हिल हॉस्पिटलने आपल्या कारभाराचा नमुनाच दाखवून दिला आहे. वाझर गावात कोरोनाने आठ लोक बळी पडले असतानाच अवघ्या दोन लोंकाची नोंद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली असून त्यातील एका जिवंत व्यक्तीला मृत ठरवल्याने गावात सिव्हिलच्या कारभाराचे हसे होऊ लागले आहे.
याबत अशी माहिती की, संजय जाधव हे आपल्या पत्नीला कोविडच्या उपचारासाठी पलूस येथील एका कोविड सेंटरमध्ये गेले होते. जाधव यांच्या पत्नीवर वर चांगले उपचार होऊन त्या बरे होऊन घरी आल्या. मात्र त्यांच्या पतीची नोंद मिरज सिव्हीलने मृत अशी केली आहे. त्यामुळे गावात संताप व्यक्त होतोय. गावात सिव्हिल कडून आलेल्या यादीत दोन लोकांचीच कोविडने मृत्यू नोंद दर्शवते. त्यातही कोरोना न झालेल्या जिवंत व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. गावात एकूण आठ लोकांचे कोरोनाने बळी गेले आहेत. या यादीत एका महिलेचे नाव आले असून दुसरे नाव चुकीचे आले आहे.उर्वरित सहा लोंकाची नावे नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मिरज सिव्हिल हॉस्पिटलने आपल्या कारभारात सुधारणा करावी सर्व मृत्यू व्यक्तीची नावे निश्चित करून आठ मृतांचे दाखले देण्यात यावेत आणि ज्या व्यक्तीचे नाव चुकीचे लागले आहे. त्याचे नाव वगळावे व चुकीची झालेली नोंद रद्द करून आठ मृतांची नावे नोंदवावित अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.