प्रतिनिधी / मिरज
मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या महिलेने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. सदर महिला कोरोनामुक्त झाली होती. तरीही तिने आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची गेल्या वर्षभरातील ही दुसरी घटना आहे.
मागील आठवड्यात या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांची ऑक्सिजन पातळी स्थिर झाल्याने प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. तिची पुन्हा कोरोना चाचणी केल्यानंतर तिचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे सदर महिला कोरोनामुक्त झाल्याने तिला डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र, सोमवारी सकाळी त्यांनी गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
नऊ महिन्यात दुसरी आत्महत्या
दरम्यान, मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना बाधिताने आत्महत्या केल्याची वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. नऊ महिन्यांपूर्वी एका महिलेने कोरोनाचे उपचार सुरू असताना धारधार चाकूने गळा कापून घेऊन आत्महत्या केली होती. आता सदरच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शासकीय रुग्णालय प्रशासनासह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.