सिव्हील प्रशासनाला दिलासा, ओमायक्रॉन अहवाल अद्याप प्रलंबित
मिरज / प्रतिनिधी
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना बाधित आढळलेल्या 97 विद्यार्थ्यांपैकी 84 विद्यार्थी कोरोनामुक्त झाले आहेत. गुरूवारी रात्री या सर्व विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आणखी 13 विद्यार्थ्यांची प्रकृतीही ठणठणीत असून, त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली. कोरोनाबाधित आढळलेले सर्व विद्यार्थी कोरोनामुक्त झाल्याने सिव्हील प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकाचवेळी सात विद्यार्थीनी कोरोना बाधित आढळल्या होत्या. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेतला असता 97 विद्यार्थी बाधित आढळून आले. त्यामुळे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोरोनाचा हॉटस्पॉट बनले होते. जिल्हा प्रशासन आणि सिव्हील प्रशासनाची धावपळ उडाली होती. या सर्व विद्यार्थ्यांना मिरज शासकीय रुग्णालयात थेट उपचारासाठी दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या ओमायक्रॉन चाचणीसाठी पुणे आणि दिल्ली प्रयोगशाळेकडे अहवाल पाठविण्यात आला होता. तत्पूर्वी 97 पैकी 84 विद्यार्थी कोरानामुक्त झाले. तर 13 विद्यार्थ्यांनाही लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.