तासगाव-कुमठे फाट्यावर झाला होता अपघात
प्रतिनिधी / मिरज
मिरज-पंढरपूर रस्त्यावर तासगाव-कुमठे फाटा येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तानाजी मारुती पाटील (वय 45, रा. वारणाली) या बेदाणा व्यापाऱ्याचा मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी चारचाकी चालक महादेव अर्जुन सानप (वय 50, रा. चिन्मय पार्क, यशवंतनगर, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तानाजी पाटील हे मोटारसायकल (एमएच 10-बीटी-7569) घेऊन तासगाव फाट्यावरून कोल्ड स्टोरेजकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या (एमएच-10-सीएक्स-6582) चारचाकीने त्यांना जोराची धडक दिली होती. या अपघातात पाटील हे रस्त्याकडेला फेकले जाऊन त्यांना जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अपघात घडल्यानंतर चारचाकी चालकाने जखमीला अपघातस्थळी तसेच सोडून पळ काढला होता. जखमी पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री तानाजी पाटील यांचा मृत्यू झाला. अपघात घडवून मोटारसायकल स्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी महादेव अर्जुन सानप या चारचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.








