प्रतिनिधी/मिरज
वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टीक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रात वाढ होण्याकरीता अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत कृषी सहाय्यकांकडे नोंदणी करावी, असे आवाहन तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
अशी होईल पिक स्पर्धा
स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांच्या शेतावर किमान दहा आर क्षेत्रावर ज्वारी, गहू आणि हरभरा या रब्बी पिकांची सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिक स्पर्धेतील पिकांच्या कापणीसाठी फ्लॉटची निवड ही सांखिकी विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात येईल. कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच स्पर्धेत भाग घेता येईल. एकाचवेळी अनेक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेतील विजेत्यांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर रोख रक्कमेचे पारितोषिक देण्यात येईल.