उमेदवार निश्चितीसाठी नेते सक्रिय, काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपाची प्रतिष्ठा पणाला
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवरील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य सरसावले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपा नेत्यांनीही भविष्यातील विजयीची गणिते निश्चित करण्यासाठी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकींवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मालगांव, म्हैसाळ, आरग, भोसे, कवलापूर, एरंडोली या गावातील निवडणुका चूरशीच्या आणि लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात तालुक्यातील कवठेपिरान, कर्नाळ, चाबुकस्वारवाडी, मालगांव, कवलापूर, डोंगरवाडी, आरग, भोसे, लिंगनूर, कळंबी, एरंडोली, शिंदेवाडी, मल्लेवाडी, लक्ष्मीवाडी, इनामधामणी, तुंग, ढवळी, अंकली, शिपूर, विजयनगर, तानंग आणि म्हैसाळ या २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सध्या या गावात स्थानिक नेत्यांकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपा नेत्यांना ही निवडणूक प्रतिष्ठेची करावी लागणार आहे. मिरज मतदार संघातील गावात आपले प्राबल्य निर्माण करण्यासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही गेल्या काही महिन्यांपासून पक्षप्रवेशाच्या माध्यमातून जिल्हा उपाध्यक्ष मनोजबाबा शिंदे यांनी आपले प्राबल्य निर्माण केले आहे. काँग्रेस नेत्यांकडून अद्याप फारशा हालचाली नसल्या तरी काँग्रेसचे स्थानिक नेते मात्र, आपल्या प्राबल्यासाठी सरसावले आहेत. या निवडणुकीतील यशापयशावर जिल्हा पातळीवरील संस्थांच्या निवडणुकीची गणिते ठरणार असल्याने वरिष्ठ नेत्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला चांगलेच महत्त्व दिले आहे.








