ऑनलाईन टीम / मिरज
सांगली जिह्यात सध्या झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेऊन मिरज कोरोना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात २० खाटा वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रुग्णालय प्रशासनाने तसा अहवाल पाठविल्याने अतिदक्षता विभागात खाटांची संख्या वाढविण्यासाठी राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. आता कोरोना रुग्णालयात ६० खाटांचा अतिदक्षता विभाग असणार आहे.
मिरज कोरोना रुग्णालयात यापूर्वी ४० खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. तर कोरोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी ३०० खाटांचा आयसोलेशन विभाग सुरू करण्यात आला आहे. या रुग्णालयात सांगली, कोल्हापूर, सातारा जिह्यातील रुग्णही दाखल होत आहेत. याशिवाय सांगली जिह्यातील रुग्ण संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालल्याने रुग्णालयात खाटांची संख्या कमी पडू लागली आहे. वेळप्रसंगी शहरातील खासगी रुग्णालयातच आयसोलेशन वार्ड उभे केले जाणार आहेत. यासाठी तीन मोठी रुग्णालयेही सज्ज आहेत.
मागील आठवड्यापासून झपाट्याने रुग्ण संख्या वाढली. त्यामुळे मिरज कोरोना रुग्णालयात ३०० खाटांचा आयसोलेशन विभागातील सर्वच्या सर्व खाटा यापूर्वीच हाउढसफुल्ल झाल्या. याशिवाय अतिगंभीर रुग्णांच्या निगराणीसाठी अतिदक्षता विभागात काही रुग्णांना ठेवण्यात आले. मात्र, केवळ ४० खाटांचा असलेला अतिदक्षता विभागही सध्या फुल्ल झाल्याने खाटांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने शासनाला अहवाल पाठविला. राज्य शासनाने या अहवालाची गंभीर दखल घेऊन तात्काळ २० खाटा वाढविण्यासाठी मंजूरी दिली आहे.