प्रतिनिधी/ चिपळूण
मिरजोळी गावातील नळपाणी योजनेच्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे दरदिवशी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून ग्रामस्थांना कमी पाणी, तर वाया अधिक जात आहे. असे असताना ग्रामपंचायत ही गळती काढण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
काही वर्षापूर्वी गावासाठी जलस्वराज्य पाणी योजना साकारण्यात आली. मात्र येथील भौगोलीक परिस्थितीचा विचार न करता पाईपलाईन व पंपहाऊस बांधण्यात आले आहेत. तसेच सर्वच नियम धाब्यावर बसवून पंपासह, पाईपलाईनचे पाईप अन्य कमी दर्जाची यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना मंत्रालयापर्यंत झालेल्या तक्रारीमुळे चांगलीच गाजली. मात्र काही बडय़ा राजकारण्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी आपली राजकीय ताकद वापरून योजनेला सर्वच स्तरावर अभय दिले आणि त्याचे परिणाम आता ग्रामस्थांना भोगावे लागत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून पंपहाऊसमधून गेलेली मुख्य पाईपलाईनच फुटली आहे. तिला सध्या टय़ूबने बांधून ठेवण्यात आले आहे. त्याचा परिणाम टाक्या भरण्यावर पर्यायाने वीजबिलांवर होत आहे. तसेच दोन बौध्दवाडय़ा, रोहिदासवाडी, पवारवाडी, मोहल्ला, दत्तवाडी या वाडय़ांमध्ये तब्बल 25 हून अधिक ठिकाणी मुख्य पाईपलाईनलाच गळती आहे. त्यातच काही ग्रामसांच्या अंतर्गंत जोडण्याही जीर्ण झाल्या असून त्यातूनही मोठय़ाप्रमाणात पाणी वाया जाते. गावातील तीन-तीन वाडय़ांना ठरल्याप्रमाणे एक दिवसाआड पाणी येते. त्यामुळे दिवसाला हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या गळतीमुळे तितक्याशा दाबाने ग्रामस्थांना पाणी मिळत नसून टोकाला असलेल्या घरांना तर पाणीच मिळणे कठीण बनले आहे. मात्र असे असताना या पाईपलाईनची कामे करायला येणाऱयांना वेळेत पैसे मिळत नसल्याने ते येण्यास राजी होत नाहीत. त्यामुळे गळती काढण्याच्या कामाचे घोंगडे भिजत पडले आहे.









