प्रतिनिधी/मिरज
हॉटेलमध्ये दारु पित असताना मुन्ना मागलेकर (वय 32, रा. रेवणी गल्ली, मिरज) या तरुणाचा त्याच्याच जवळच्या मित्राने सोमवारी रात्री खून केला. हॉटेलमध्ये दारु पित असताना वाद झाल्याने हा खून झाला. याबाबत पोलिसांनी राजू शेख (वय 35, रा. रेवणी गल्ली) याला अटक केली आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत महात्मा गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मुन्ना मांगलेकर आणि राजू शेख हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीतून वाद सुरू होते. सोमवारी रात्री आठनंतर मुन्ना आणि राजू हे दोघे हॉटेल सनशाईनमध्ये दारु पित बसले होते. त्यावेळी किरकोळ कारणातून त्यांच्यात वादावादी झाली. एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाण सुरू झाली. यावेळी राजू याने कोणत्या तरी अज्ञात हत्याराने मुन्ना मांगलेकर याच्यावर हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला? याबाबत अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. दरम्यान, आर्थिक कारणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.