मजूर मृत्यूप्रकरणी आंदोलनाचा तिसरा दिवस, मजूराचा मृतदेह शासकीय रुग्णालयातच
प्रतिनिधी/मिरज
शहरातील म्हाडा कॉलनी येथे जिन्यावरुन घसरुन पडल्याने मारुती कांबळे उर्फ महंमद शेख या मजूराचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरपीआय आठवले गटाच्या वतीने बुधवारी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्रन् दिवस महापालिका प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू असताना अधिकाऱ्यांनी बेदखल केल्यामुळे बुधवारी आंदोलनकर्त्यांनी अंगावर चाबकाचे फटके मारुन घेत महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. मयताच्या कुटुंबियांना तातडीने 25 लाख रुपयांची मदत न दिल्यास मारुती कांबळे याचा मृतदेह महापालिकेत आणून ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.