प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील विद्यानगर येथे भिमराव रामचंद्र हिंदूरे या निवृत्त शिक्षकाचा बंगला फोडून चोरट्यांनी 19 तोळ्याचे दागिने लंपास केले. गुरुवारी भरदिवसा ही चोरी झाली. भर दिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी घटनस्थळी पंचनामा केले. ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिस पथके पाचारण करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, विद्यानगर या ठिकाणी भिमराव रामचंद्र हिंदूरे हे निवृत्त शिक्षक यशोधन या बंगल्यात रहात आहेत. गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता ते आपल्या पत्नीसह बंगल्याला कुलूप लावून आठवडा बाजारात गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाची कडी तोडून कपाटातील 19 तोळ्याचे दागिने लंपास केले. यामध्ये दहा तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, पाच तोळ्याचे गंठण, दीड तोळ्याची चैन, दोन अंगठ्या, कर्णफुले, ठुशी असा जवळपास 19 तोळ्याचा आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत भिमराव रामचंद्र हिंदूरे यांनी महात्मा गांधी चौक पोलिसात चोरीची फिर्याद दिली असून सदर भरदिवसा घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.