तिघांना अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जफ्त
प्रतिनिधी / मिरज
लॉकडाउढनमध्ये दारु विक्रीला प्रतिबंध असताना गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दारु वाहतुकीसाठी वापरलेली मारुती सुझूकी अल्टो गाडी, 50 हजार रुपयांची दारु असा एक लाख, 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जफ्त करण्यात आला आहे.
बेडग रोडजवळील वखारभाग फाट्याजवळ निळ्या रंगाच्या मारुती सुझूकी अल्टो गाडीतून दारु वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांना बातमीदारामार्फत मिळाली होती.
पोलिसांनी सापळा रचला असता, त्यांना निळ्या रंगाची अल्टो कार आढळून आली. त्यामध्ये असणाऱ्या इसमांना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली असता, गोवा बनावटीच्या 180 मिलीच्या 432 बाटल्या, 750 मिलीच्या दहा बाटल्या, तर गोल्ड ऍन्ड ब्लॅक ट्रीपल कंपनीच्या 24 बाटल्या, गोल्डन ब्ल्यू व्हीस्की कंपनीच्या 96 बाटल्या असा सुमारे 50 हजार रुपयांची दारु मिळून आली. वाहनामधील अजित मुरग्याफ्पा कट्टीकर (वय 22), शांतीनाथ सुरेश चौगुले (वय 25), प्रमोद संभाजी हंडीफोड (वय 22, तिघे रा. लक्ष्मीनगर, मालगांव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.