प्रतिनिधी / मिरज
वैद्यकीय पांढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज शहर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी दुपारी कोरोनाचा अक्षरशः विस्फोट झाला. दुपारी एक वाजेपर्यंत ग्रामीण भागात सर्वाधिक 21 तर महापालिका क्षेत्रात 10 अशा 31 नव्या रुग्णांची भर पडली. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 83 वर पोहचली आहे. रुग्ण संख्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहचली असून, संपूर्ण मिरज कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत चौघांचा बळी घेतला आहे. नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
शहरात कोरोनाचे थैमान सुरूच असून, गुरुवारी एकाच दिवशी २४ कोरोना रूग्ण आढळले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही नव्या 31 रुग्णांची भर पडल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अर्धशतक पूर्ण झाले. यामुळे खळबळ माजली आहे. दिवसेंदिवस वाढणारी शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ही चिंताजनक आहे.
शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार मिरज शहरात 10 तर ग्रामीण भागात 21 अशा 31 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे मिरज शहरासह तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 83 वर पोहचली आहे. रुग्ण संख्या वाढीचा आलेख असाच सुरू राहीला तर आणखी काही तासात पॉझिटिव्ह रुग्णांचे शतक पूर्ण होईल. वैद्यकीय पढरीलाच कोरोनाचा विळखा पडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. ग्रामीण भागात तर रस्ते खोदून गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आला असून आतापर्यंत शेकडो जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. नागरिकांनी घरीच रहावे, सुरक्षित रहावे, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Previous Articleकर्नाटक : लॉकडाऊन वाढवू नका – मुख्यमंत्री येडियुरप्पा
Next Article ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांपार








