प्रतिनिधी/मिरज
पावसाची संततधार आणि कोयना धरणातून वाढविण्यात आलेला विसर्ग यामुळे कृष्णा नदीच्या पातळीत वाढच होत आहे. मिरज कृष्णाघाटावरील कृष्णा नदीची पाणी पातळी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 53 फुटांवर पोहचली आहे. कृष्णाघाटवरील स्मशानभूमीत आणि शेतांमध्ये पाणी शिरण्याबरोबर म्हैसाळ आणि ढवळी गावाचा संपर्क तुटला आहे. 2019 सालच्या महापूराचा अनुभव पाठीशी असल्याने ढवळी गावातील ग्रामस्थांनी तात्काळ स्थलांतर सुरू केले आहे. पशुधन आणि जनावरांना घेऊन ग्रामस्थ सुरक्षित स्थळी स्थलांतर होत आहेत.
मिरज कृष्णानदीच्या पाणी पातळीत शुक्रवारी दिवसभरात 13 फुटांची वाढ झाली. गुरूवारी रात्री पाणी पातळी 38 वर होती. रात्रभर त्यामध्ये वाढ होऊन सकाळी 42 झाली. त्यानंतर दिवसभरामध्ये पुन्हा 11 फुटापर्यंत वाढ होऊन सायंकाळी साडेपाच वाजता हीच पाणी पातळी 53 फुटांवर पोहचली आहे. कृष्णा नदीला आलेल्या या पूरामुळे ढवळी, म्हैसाळसह काही वाडय़ा वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. शेतांमध्ये पाणी शिरले असून, ग्रामस्थ स्थलांतरी होत आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी पूरप्रवण भागाला भेट देऊन नागरिकांना स्थलांतरीत होण्याच्या सुचना दिल्या आहेत.