प्रतिनिधी/मिरज
महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, बुधवारी भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने आशिष सुभाष गौराजे (वय 5) या बालकाचा मृत्यू झाला. वारंवार महापालिकेला सांगूनही भटक्या कुत्र्यांचा बांदोबस्त होत नसल्याने महापालिकेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र, डॉगव्हॅन असूनही त्यांचा बंदोबस्त होत नाही. भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील ब्राम्हणपुरी भागात वाटवे गल्ली येथे राहणाऱ्या आशिष सुभाष गौराजे या पाच वर्षाच्या बालकाला घरासमोर खेळत असताना भटक्या कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये आशिष हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्या शरिरात इन्फेक्शन झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली. अखेर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी त्याची प्राणज्योत मालविली.
केवळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्याने सदरचा बालक दगावल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रुग्णालयानेही सदर मुलाच्या उपचारासाठी हलगर्जीपणा केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. आशिष याचे वडील मजूर असून, आई गृहीणी आहे. मुलाच्या उपचारासाठी त्यांनी सुमारे दोन लाख रुपये खर्च केले. मात्र, जीव वाचविता आला नाही. यामुळे ब्राम्हणपुरी भागात हळहळ व्यक्त होत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न करणाऱया महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.








