तब्बल 33 तास सतारवादन : नईम सतारमेकर यांनी बनविलेली सतार
मानसिंगराव कुमठेकर/मिरज
मिरजेतील युवा तंतुवाद्यनिर्माते नईम सतारमेकर यांनी तयार केलेल्या सतारीवर दिल्लीचे संगीतशिक्षक राजकुमार यांनी तब्बल 33 तास 34 मिनीटे सतारवादन करीत जागतिक विक्रम केला आहे. या विश्वविक्रमासाठी नईम सतारमेकर यांनी विशेष प्रकारची सतार राजकुमार यांना तयार करून दिली होती. विश्वविक्रम करणारी खास सतार बनविल्याबद्दल नईम सतारमेकर यांचे संगीतक्षेत्रात कौतुक होत असून मिरजेच्या तंतुवाद्यनिर्मितीच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे.
मिरज शहर हे दीडशे वर्षांहून अधिक काळ तंतूवाद्य निर्मितीसाठी प्रसिध्द आहे. येथून देश-परदेशात तंतूवाद्याची निर्यात केली जाते. तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रवीणा यांसारख्या वाद्यांना नामांकीत कलाकारांकडून मागणी असते. दीडशे वर्षांपूर्वी फरीदसाहेब सतारमेकर यांनी लावलेल्या तंतूवाद्य निर्मितीच्या रोपटÎाचा आज वटवृक्ष झाला आहे. अनेक कारागिर यामध्ये कार्यरत आहेत. तंतूवाद्य निर्मितीची एक मोठी पेठच येथे वसली आहे. देशात आणि देशाबाहेरही मोठÎा प्रमाणात ही तंतुवाद्ये विक्री होतात. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामवंत गायक-वादक येथून तंतुवाद्ये खरेदी करतात.
तंतुवाद्याच्या या माहेरघरातील कारागिरांनी सातत्याने प्रयोग करीत वैविध्यपूर्ण तंतुवाद्ये बनविली आहेत. अशा पध्दतीची एक खास सतार येथील युवा तंतुवाद्यनिर्माते नईम सतारमेकर यांनी तयार केली आहे. दिल्ली येथील संगीत शिक्षक राजकुमार यांच्यासाठी ही सतार त्यांनी तयार केली. राजकुमार हे सध्या दिल्ली सरकारच्या शासकीय प्रतिभा विकास विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सलग सतारवादनाचा जागतिक विक्रम करण्याचे ठरविले.
त्यासाठी त्यांनी विशेष पध्दतीच्या सतारीची मागणी मिरजेतील तंतुवाद्यनिर्माते नईम सतारमेकर यांच्याकडे केली. नईम यांनी सुमारे दोन महिने परिश्रम घेऊन कोणताही अडथळा न येता कित्येक तास सलग वाजविता येईल, अशी सतार तयार केली. सलग वादन करताना त्यांच्या तारा तुटू नयेत, जवारी कायम राहावी यासाठी नईम सतारमेकर यांनी विशेष पध्दतीची सतारीची रचना केली.
याच सतारीवर संगीतशिक्षक राजकुमार यांनी दिल्ली येथे सलग 33 तास 34 मिनिटे सतार वाजवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. यापूर्वी केरळच्या राधाकृष्णन मनोहरन यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये 29 तास 8 मिनिटांचा सलग सतारवादनाचा विक्रम केला होता. राजकुमार यांच्या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उपस्थित होते.
मिरजेत तयार झालेल्या या सतारीमुळेच आपल्याला सलग सतारवादनाचा विश्वविक्रम करता आल्याचे राजकुमार यांनी सांगितले. मिरजेत तयार होणाऱया सतारी या दर्जेदार असतात, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. नईम सतारमेकर यांनी खास परिश्रम सतार तयार करून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. मिरजेत तयार झालेल्या सतारीवर सलग वादनाचा विश्वविक्रम झाल्याची घटना ही मिरजेच्या तंतुवाद्यनिर्मितीच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी नोंद करण्यासारखीच आहे.








