प्रतिनिधी / सांगली
गुरुवारी जिल्ह्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये मिरजेच्या प्रसिद्ध डॉक्टरांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 319 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात सात जण कोरोनामुक्त झाले. उपचारातील रुग्ण संख्या 95 आहे , यामधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिरजेतील प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉक्टरांचा खाजगी प्रयोगशाळेत कोरोना चा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, परंतु जिल्हा आरोग्य यंत्रणेने शासकीय प्रयोगशाळेत त्यांचा पुन्हा स्वब घेतला तो ही पॉझिटिव आल्याने त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये दिलासादायक गोष्ट म्हणजे या डॉक्टरांच्या संपर्कातील कुटुंबीयांचे अहवाल निगेटिव आले आहेत. जत येथील बिळूर या गावातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गुरुवारी सात जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये पाच महिन्याच्या लहान बाळाचा समावेश आहे. शिराळा तालुक्यातील मणदूर येथील पाच महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. परंतु या बाळाने या कोरोनाला हरवून हे बाळ आता कोरोनामुक्त झाले आहे. तर मणदूर, सांगली, मोजे डिग्रज,फाळके वाडी, निबवडे येथील रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.








