आष्टा / वार्ताहर
आष्टा-मिरजवाडी येथे तरसाच्या हल्ल्यात 18 शेळ्या ठार झाल्या. यामध्ये तीन मोठ्या शेळ्यांचा तसेच 15 कोकरांचा समावेश आहे. तसेच 8 मेंढ्या गायब झाल्या. या घटनेत दोन मेंढपाळांचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली.
मिरजवाडी हद्दीत वसंत आण्णासो आवटी यांचा शेतात खतासाठी मेंढ्या बसविण्यात आल्या होत्या. तानाजी गावडे आणि केरू भानुसे यांनी मेंढ्या बसवल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान सर्व मेंढ्यांना लोखंडी डालग्यात तसेच जाळ्यात बंदिस्त करून मेंढपाळ घरी निघून गेले. दरम्यान , पाच ते सहा च्या दरम्यान तरसाच्या कळपाने शेळ्यांवर हल्ला चढविला. तरसांच्या हल्ल्यात एकूण 18 मेंढ्या ठार झाल्या.