प्रतिनिधी/ रत्नागिरी
मिरकरवाडा बंदरात सुमारे 44 नौका अनाधिकृत असल्याचे मत्स्य विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. या नौकांवर नोंदणी क्रमांकच नसून या बेवारस नौकांची माहीती पोलीस विभागाला देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हय़ात मोजक्याच मिनी पर्ससीनेट नौकांकडे परवाना असल्याची माहीती परवाना अधिकारी ड़ॉ रश्मी आंबुलकर-नाईक यांनी दिली आह़े
जिल्हय़ाच्या समुद्री क्षेत्रामध्ये शेकडो मिनीपर्ससीन नौका मासेमारी करत आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणताही परवाना नसून या अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण आणावे अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे. या अनधिकृत नौकांमुळे मिरकरवाडा बंदरावर मच्छीमार नौकांची प्रचंड गर्दी झाली असून अनेकदा अधिकृत परवानाधारक नौकांना नांगरणीसाठीच जागाच मिळत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभुमीवर मत्स्यविभागाने नौकांची तपासणी मोहिम हाती घेतली आहे.
या तपासणीमध्ये मिरकरवाडा बंदरात 44 अनधिकृत नौका असल्याचे मत्स्य विभागाला आढळून आले आहे. या नौकांबाबत कोणत्याही प्रकारची नोंदणी अथवा माहिती मत्स्य खात्याकडे नाह़ी या नौकांवर नोंदणी क्रमांकच नसल्याचे समोर आले आह़े त्यामुळे या अनधिकृत नौकांची माहिती पोलीसांना देण्यात आली आहे. आता पुढे कोणती कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.
1 सप्टेंबरपासून पर्ससीननेट मासेमारी सुरु झाली आह़े जिह्यात काही मोजक्याच मिनी पर्ससीन नौकांनी परवाना घेतला आहे. इतर नौका अनधिकृत मासेमारी करत असल्याच्या पारंपारिक मच्छीमारांच्या आक्षेपानंतर मत्स्य विभागाने 3 मिनी अनधिकृत पर्ससीन नौकांवर कारवाई केल्याची माहितीही अधिकाऱयांनी दिली.
10 ट्रॉलर्सवर कारवाई
किनारपट्टीलगत 10 वावाच्या आत विना परवाना मासेमारी करणाऱया 10 टॉलर्सवर कारवाई करण्यात आली आह़े त्याचबरोबर विनापरवाना मासेमारी करणाऱया 3 मिनी पर्ससीन नौकांवर सहाय्यक मत्स्य आयुक्त ना. वि. भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी ड़ॉ रश्मी आंबुलकर-नाईक यांनी कारवाई केली आह़े या कारवाईत पर्यवेक्षक तुषार करगुटकर, सुरक्षा रक्षक मयुरेश गवंडे, सुरज राऊत व परेश मंडुळा यांनी सहकार्य केले.









