ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त भाषणाबद्दल कोलकाता पोलिसांकडून बॉलिवूड अभिनेता आणि भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी सुरू आहे.
वादग्रस्त भाषण प्रकरणात मिथुन यांच्याविरुद्ध माजौता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मिथुन यांनी एफआयआर रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. या प्रकरणात मिथुन यांची चौकशी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले होते. या संदर्भात पोलिसांनी आज चौकशी सुरू केली आहे.
भाजपमध्ये प्रवेश करताच मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस सरकारविरोधात जोरदार निशाणा साधला. निवडणुकीच्या व्यासपीठावरून ते म्हणाले होते, “मी नंबर वन कोब्रा आहे. जर मी दंश केला तर तुमचे फोटो लागतील,” मला गरिबांसाठी लढायचे आहे, मी राजकारण नव्हे तर मानव सेवा करणार आहे, असेही ते म्हणाले होते.









